डोंबिवली | डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे परिसरात एका हाय प्रोफाईल सोसायटीतील प्ले झोन मध्ये खेळत असताना लोखंडी अँगलमध्ये डोकं अडक्याने अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सक्षम उंडे असे या मुलाचं नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या धक्कदायाक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील मानपाडा परिसरात रीजन्सी अनंतम ही सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना सक्षम हा पाच वर्षाचा मुलगा आहे. ३१ तारखेला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सक्षम हा या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला. त्याची आई तेथे बाहेरच उभी होती. मात्र खेळता खेळता एका खेळण्याच्या साहित्यामध्ये त्याचं डोकं अडकलं आणि तो बेशुद्ध झाला. थोड्या वेळाने तेथील कामगारांचे सक्षमकडे लक्ष गेले असता, त्यांनी तातडीने धाव घेऊन त्याला बाहेर काढलं. उपचारांसाठी त्याला तातडीने एम्स हॉस्पिटमलध्ये नेण्यात आलं.मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हे ऐकून त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची आई, वडील शोकाकुल झाले. त्यांच्या दु:खाला पारावर उरला नाही. अवघ्या ५ वर्षांच्या या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली