
आई-वडिलांचं स्वप्न मोठं, पण मुलाने केलं खोटं, असा मुलगा नको गं बाई!
कल्याण |अभिषेक सानप या 23 वर्षीय तरुणाच्या आई-वडिलांची आपल्या मुलाने पोलीस अधिकारी बनावं अशी इच्छा होती. त्यासाठी त्याने अभ्यास करुन पोलीस बनणं जास्त आवश्यक होतं. पण त्याने वेगळीच शक्कल लढवली. तो आई-वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी पुण्यामध्ये चक्क एका दुकानात गेला. त्याने तिथे कपडे घेतले आणि ते कपडे त्याने शिवून घेतले. तो ते कपडे घेऊन पुण्याहून मालाडला आला. तो मालाडला त्याच्या नातेवाईकांकडे गेला. त्यानंतर तो सायंकाळी कसाऱ्याला काही कामानिमित्त मुंबईवरून निघाला. मात्र पोलिसांचा गणवेश घालून तो महिला डब्यात जाऊन बसला.कल्याण ते वाशिम रेल्वे स्टेशन दरम्यान लोकल डब्यात गस्त घालत असलेले कल्याण लोहमार्ग पोलीसही यावेळेस महिला डब्यात चढले. त्यांनी अभिषेकला पोलीस खात्याविषयी विचारले. तो कुठे कार्यरत आहे? याची माहिती विचारली. मात्र अभिषेकला खऱ्या पोलिसांचे उत्तर देणे जमले नाही. तो उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचं लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आलं.लोहमार्ग पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. त्याची विचारपूस केली असता त्याने पोलीस नसून आई-वडिलांसाठी पोलिसांचा युनिफॉर्म शिवल्याचे पोलिसांना सांगितलं. लोहमार्ग पोलिसांनी सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने पोलिसांचा गणवेश वापरून इतर कोणाला लुटले आहे का? याचा तपास सुरू केला आहे.


