
आदर्श गाव खुर्सापार (ता. काटोल) येथे भव्य ‘जागतिक योग दिवस’ संपन्न.
*योग दिवस विदर्भातील शेतकऱ्यांना समर्पित
-डॉ. आशिषराव र. देशमुख
• देशातील सर्वात मोठे आदर्श गाव खुर्सापार (ता. काटोल) येथे भव्य ‘जागतिक योग दिवस’ संपन्न.
• शेतकरी आणि ग्रामीण महिलांसोबत योगा करून डॉ. देशमुख यांनी स्वस्थ आणि प्रगतीशील भारताचा केला संकल्प.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण विश्वाला निरोगी करण्याचे काम करीत आहेत. केंद्र सरकारतर्फे २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्याने प्रत्येक राज्यातून एका गावाची निवड करून ते गाव ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून विकसित केले जाणार आहे. महाराष्ट्रातील २७,००० गावांतून हा मान खुर्सापार (ता. काटोल, जि. नागपूर) ग्रामपंचायतीला मिळाला आहे. या आदर्श गाव पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केली असून या ग्रामपंचायतीला केंद्र आणि राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर खुर्सापारची निवड करण्यात आली असून ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून खुर्सापारला विकसित केले जाणार आहे तसेच येथे वर्षभर योगासंबंधी कार्यक्रम घेतले जाणार आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मी या क्षेत्राचा माजी आमदार असून या ग्रामपंचायतीचे उल्लेखनीय कार्य मी प्रत्यक्ष बघितले आहे. खुर्सापारच्या योगसंबंधी विकासासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे.
प्रत्येक नागरिकांचे आरोग्य निरोगी व स्वस्थ ठेवण्यासाठी सर्वांना योग व प्राणायामची आवश्यकता आहे. योगामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असून ते निरोगी जीवन जगत आहेत. शेतकरी, मजूर, अबाल वृद्ध, स्त्री, पुरुष, विद्यार्थी व समस्त नागरिकांचे निरोगी शरीर व दीर्घ आयुष्याकरिता दैनंदिन जीवनात योगसाधना अत्यंत उपयोगी आहे. योग साधनेमुळे शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबियांना तणावमुक्त व निरोगी जीवन जगता येईल. खुर्सापार येथे आयोजित केलेला हा भव्य योग दिवस मी विदर्भातील शेतकऱ्यांना समर्पित करीत आहे”, असे प्रतिपादन काटोलचे माजी आमदार आणि भाजपचे नेते डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले.देशातील सर्वात मोठे आदर्श गाव खुर्सापार (ता. काटोल, जि. नागपूर) येथे भव्य जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधव, ग्रामीण महिला आणि विद्यार्थ्यांसोबत योगा करून स्वस्थ आणि प्रगतीशील भारताचा संकल्प डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केला आणि सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच सुधीर गोतमारे आणि ग्रामस्थांनी योगसाधनेत भाग घेतला.