
जीवनात पैसा गौण, कर्तृत्व महत्वाचे” – मेजर जनरल एस. के. विद्यार्थी
“जीवनात पैसा गौण, कर्तृत्व महत्वाचे” – मेजर जनरल एस. के. विद्यार्थी
काटोल, प्रतिनिधी:बनारसीदास रुईया हायस्कूल, काटोल येथे माजी सैनिक संघटना व शाळा कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट संदेश दिला की “जीवनात पैसा गौण असून कर्तृत्व अधिक महत्त्वाचे आहे.”
त्यांनी असे सांगितले की, “माझ्या अंगावर वर्दी आहे म्हणून समाजात मान आहे. परंतु जर मी त्या वर्दीच्या शिस्तीचे पालन केले नाही, तर समाजात माझे स्थान टिकणार नाही. म्हणूनच आजही सैनिकांबद्दल समाजात आदर आणि विश्वास टिकून आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप चांडक (अध्यक्ष, ब. रु. हायस्कूल कमेटी) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेजर जनरल विद्यार्थी यांच्यासोबत कर्नल व्हेटरन्स नवनीत दुग्गल, वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन भूषण महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, मुख्याध्यापिका वंदना काळे, मुख्याध्यापिका अरुणा पवार, उपमुख्याध्यापक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात डॉ. दिलीप चांडक, तेजसिंग जगदाळे, आणि धीरज ढोले यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच मेजर शेखर पाटील यांचा भूमिअभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. वीरमाता मीराबाई सतई व विरपत्नी टीना टाले यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर रत्नाकर ठाकरे व अरुणा पवार यांनी केले. सूत्रसंचालन अजय खडसे यांनी तर आभार प्रदर्शन विजय चौधरी यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात लीना सावरकर यांनी “हम होंगे कामयाब” आणि “ए मेरे वतन के लोगो” ही देशभक्तिपर गीते सादर केली. त्यांना तबल्यावर भास्कर सिरसाट व हार्मोनियमवर कृष्णा सावरकर यांची साथ लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेजर अशोक राऊत, अनिल भिगांरे, मधुकर काळबांडे, निलेश व्यास, दिलीप जैस्वाल, विजय मूल्लेवार, संदीप काळे, पुरुषोत्तम जोगेकर, तसेच अमर ज्योती संघटना, नागपूर, काटोल-नरखेड व वरूड माजी सैनिक संघटना, व ब. रु. हायस्कूल व कॉन्व्हेंटच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने सहकार्य केले.
