
येनवा सर्कल मधून डॉ. शेषराव सोनेकर यांची भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी दावेदारी!
येनवा सर्कल मधून डॉ. शेषराव सोनेकर यांची भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी दावेदारी
पाणवाडी प्रतिनिधी :
काटोल तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून, येनवा सर्कलमध्ये राजकीय रंगत वाढू लागली आहे. काही दिवसांतच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने संभाव्य उमेदवारांच्या दावेदारीबाबत चर्चांना उधाण आले आहे.काटोल तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कलपैकी येनवा आणि पारडसिंगा हे दोन सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. मागील कार्यकाळात या सर्कलमधून अनुसूचित जातीचे प्रतिनिधी निवडून आले, मात्र अपेक्षित विकास झाला नाही, अशी नाराजी जनतेत दिसून येत आहे. येथील अनुसूचित जाती-जमातीचे प्रमाण लक्षणीय असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी अंमल करणारा, समाजातील सर्व घटकांना सोबत घेणारा उमेदवार निवडला जाणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे.
राजकीय दृष्ट्या येनवा सर्कल हा शेकाप पक्षाचा गड मानला जातो. मात्र यावेळी भारतीय जनता पक्ष या सर्कलमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपच्या गोटातून डॉ. शेषराव सोणेकर, विनोद चवरे आणि विनोद तागडे ही नावे दावेदार म्हणून चर्चेत आहेत.
त्यापैकी डॉ. शेषराव सोणेकर हे सुशिक्षित, जनसंपर्कात दांडगे आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय म्हणून ओळखले जातात. अल्पसंख्याक असूनही त्यांनी समाजाच्या सर्व घटकांमध्ये मजबूत नेटवर्क निर्माण केले आहे. येनवा सर्कलमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी ते समर्थ दावेदार ठरू शकतात, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
