
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट – काटोल तालुका आघाडीवर
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट – काटोल तालुका आघाडीवर
पाणवाडी प्रतिनिधी | नागपूर जिल्हा : नागपूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये सध्या बोगस डॉक्टरांनी अक्षरशः हौदोस घातला असून, आरोग्य यंत्रणा याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः काटोल तालुका बोगस डॉक्टरांच्या संख्येत आघाडीवर आहे. एका अंदाजानुसार या तालुक्यात प्रत्येक १० ते १५ गावांमागे किमान एक बोगस डॉक्टर सक्रिय आहे.या तथाकथित डॉक्टरांकडे वैद्यकीय परवाना नाही, ना कोणतीही अधिकृत मान्यता. तरीही हे लोक बिनधास्तपणे वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत. अनेकांनी तर खासगी रुग्णालयेही सुरू केली असून, तेथे गंभीर आजारांवर उपचार केले जात आहेत.नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ : या बोगस डॉक्टरांकडून चुकीचे निदान, अयोग्य औषधोपचार, गैरवापर करणारे इंजेक्शन, आणि तांत्रिक सुविधांशिवाय करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया – हे प्रकार सर्रास सुरू आहेत. परिणामी अनेक रुग्णांना आपल्या जीवावर बेतले आहे.
आरोग्य विभागाची बघ्याची भूमिका का?या सर्व प्रकारांकडे जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे, असा आरोप नागरिकांकडून होतो आहे. बोगस डॉक्टरांचे वाढते प्रमाण पाहता आरोग्य विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“हे सर्व त्यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिक आणि समाजसेवक यांच्यातून खालील मागण्या करण्यात येत आहेत:
1. सर्व बोगस डॉक्टरांवर तात्काळ छापे टाकून कारवाई करावी.
2. बेकायदेशीर रुग्णालये तात्काळ बंद करावी.
3. दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी.
4. तालुकास्तरावर आरोग्य विभागाची पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करावी.
बोगस डॉक्टरांचे वाढते प्रमाण ही केवळ नागपूर जिल्ह्याची समस्या नसून, ती संपूर्ण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. यावर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर रुग्णांचे जीव गमावण्याचा धोका वाढतच जाईल.
