
चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना सवालबाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोश्यारींना वृद्धाश्रमात पाठवा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली असून भाजपने राज्यपालांची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अवमानच केला नाही,
असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनी आता काही बोलणे म्हणजे विनोद केल्यासारखे आहे. राज्यपालांबद्दल उद्धव ठाकरे यांनी असं बोलणे योग्य नाही. राज्यपालांवर अशा पद्धतीने कोणी टीका करत नाही. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण राज्यपालांची वृद्धावस्था काढली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.



