
गोंदिया जिल्ह्यात धान घोटाळा !
गोंदिया जिल्ह्यात धान घोटाळा
व्यवस्थापक आशीष मुळेवार याला निलंबित
2 कोटी 72 लाख 64 हजार 81 रुपयांच्या धान्याचा अपहार केल्या प्रकरणी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी उपप्रादेशिक व्यवस्थापक आशीष मुळेवार याला निलंबित करण्यात आलंय. आशीष मुळेवार याच्यावर धान्यसाठा शिल्लक नसणाऱ्या संस्थेवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून शिवाय धान्याचा अपहार करणे तसेच चौकशी अधिकाऱ्यांवर दबाब टाकणे आणि शासनाचे नुकसान करणे आदी दोष सिद्ध झाल्याची सूत्राची माहिती आहे
आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय देवरीकडून हंगाम 2020-21 मध्ये खरेदी केंद्र आलेवाडा व हंगाम 2021-22 मध्ये खरेदी केंद्र गोरे यांना धान खरेदी न करता दोन्ही केंद्रांनी केवळ कागदावर खरेदी दाखवत शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. हंगाम 2020-21 मध्ये खरेदी केंद्र आलेवाडा येथे 90 लाख 55 हजार 784 रुपयांचा 4 हजार 847.85 क्विटल धानाचा साठा याचा घोटाळा उघडकीस आला. हंगाम 2021-22 मध्ये खरेदी केंद्र गोरे येथे 1 कोटी 82 लाख 8 हजार 297 रुपयांच्या 9 हजार 385.72 धानाचा साठा घोटाळा उघडकीस आला यामुळे आशीष मुळेवार याच्यावर 2 कोटी 72 लाख 64 हजार 81 रुपयांच्या धान्याचा अपहार केल्याचं सिद्ध झालंय. आशीष मुळेवार याच्या या कामात मदत करणाऱ्या त्यांच्यासह तत्कालीन विपणन निरीक्षक एम एस इंगले, प्रतवारिकार व विपणन निरीक्षक सी. डी. जुगनाके या तिघांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यात घोटाळ्यात एका वर्ग 1 च्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यामुळं इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत



