
शालार्थ आयडी घोटाळ्यात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार या शिक्षणाधिकाऱ्यांनाअटक

नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षणाधिकाऱ्यांना सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार या शिक्षणाधिकाऱ्यांनाअटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
त्यांच्या चौकशीतून अनेक नव्या आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे..राज्यस्तरीय एसआयटी गठीत झाल्यानंतरची ही पहिली मोठी कारवाई आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून रीतसर शालार्थ आयडीचे आदेश जारी झाले नसताना.. मात्र शिक्षण विभागातील काही भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट शालार्थ आयडी तयार केले. त्या माध्यमातून बोगस शिक्षकांना कोट्यवधी रुपयांचा वेतन अदा करून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्यात आला.या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेश्वर काळुसे हे १६ मार्च २०२४ पासून आजपर्यंत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर रोहिणी कुंभार शिक्षणाधिकारी होत्या. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बुधवारी अटक केली.शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित करण्यात आली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणी सर्व तक्रारीची या एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. नागपुरातील झोन 2 चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत. आता त्यांच्याच नेतृत्वात राज्यातील इतरही जिल्ह्यात या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी केली जाणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत या घोटाळ्यात 24 अधिकारी आणि मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित 3 गुन्हे दाखल आहेत. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याने तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंजुरी दिली आहे.
