
संविधानातील कलमाचे वाचन करून डॉ.आंबेडकर यांना अभिवादन
शेकापूर शाळेत डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी / १४ एप्रिल
काटोल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेकापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित केले. त्यानंतर भारतीय संविधानातील ३९५ कलमांचे वाचन केले.
शिक्षक राजेंद्र टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “संविधान ही केवळ कायद्यांची यादी नसून, ती आपल्याला समानता, स्वातंत्र्य व बंधुतेचा मार्ग दाखवते.”
विद्यार्थ्यांनी संविधानातील प्रस्तावनेचे पाठांतर करत ‘आम्ही भारताचे लोक…’ अशी गगनभेदी घोषणा दिली. या उपक्रमात रुद्र वैद्य, कृतिका राऊत, नव्या वैद्य, खुशी नामूर्ते, अनुष्का कौरती, दृष्टी शेंदरे, उर्वशी मरकामे, वैदेही कुंभरे, निशा वाघ, आरव वाघाडे, धनश्री कौरती, विधी धुर्वे, धनश्री कळसाईत, पायल कुंभरे, युग नेवारे, अथर्व कौरती, सार्थक शेंदरे, प्रियांशी नेहारे, गिरीष मरकामे, युवराज युवनाते या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र टेकाडे, स्वयंसेविका मनीषा धुर्वे, मदतनीस रोहिणी धुर्वे यांचे विशेष योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गणेशपूर गटग्रामपंचायत सरपंच सौ.संजीविनी राजेश मडके यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचे हे काम या विद्यार्थ्यांनी आज केले आहे, हे निश्चितच गौरवास्पद आहे.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली असून गावकऱ्यांमध्येही लोकशाही मूल्यांबाबत जागरूकता निर्माण झाली.