
वाढदिवसाचा केक ठरला कारणीभूत !मित्रानेच केला मित्राचा घात
उल्हासनगर कॅम्प २ मधील खेमानी परिसरातील राहणारा प्रदीप वर्मा हा तरूण 26 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास जेवणानंतर बाहेर शतपावली करायला बाहेर पडला. मात्र तेवढ्यात एका अल्पवयीन तरूणाने त्याच्या पोटात चाकू खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारांसाठी त्याला तातडीने उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या १३ दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र त्याची ही लढाई अखेर थांबली. उपचारांदरम्यान प्रदीप याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली.
आमचा मुलगा, प्रदीप याच्या एका मित्राचा वाढदिवस होता, जवळच्या चौकात वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येणार होता. मात्र प्रदीप हा त्यावेळी तिथे गेला नाही, हाच राग मनात ठेवून दोन अल्पवयीन मुलांनी आमच्या मुलाची हत्या केली, असा आरोपी प्रदीपच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणात अद्याप एकालाच ताब्यात घेतले आहे मात्र या खुनामागे आणखी कोणाचा हात आहे, ते शोधून इतर आरोपींनाही अटक करावी, त्याशिवाय आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा वर्मा यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.



