
सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’ तर कपाशीवर आले बोंडअळीचे संकट
सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’ तर कपाशीवर आले बोंडअळीचे संकट
अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यात चालू वर्षी १४ हजार ८५६ हेक्टरवर सोयाबीनची तर कापूस १९ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसल्याने नदी व नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठी हानी सहन करावी लागली. यंदा बळीराजावरील संकट संपायचे नाव घेत नसून गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे हाता- तोंडाशी आलेले सोयाबीन पिकांवर ‘येलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे असलेले सोयाबीन पूर्णतः वाळून गेले. अशातच आता कपाशीचे पिक चांगले जोमात असताना कपाशीमधील बोडअळीने डोकं वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. शेती जानकारांच्या मते यंदा सोयाबीन व कापसाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यावर्षी ४२ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे तर ३० हजार ४५७ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा विमा कंपनीकडे दावा केला आहे. विमा कंपनीकडून २२ हजार ७०० शेतकऱ्यांची नुकसान पाहणी झाली. मात्र अद्यापही विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही.
आता आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा मात्र सरकारकडून मदतीची अपेक्षा करीत आहे.



