
सरकारने डाव खेळला, तर प्रत्युत्तर देणं गरजेचं — मनोज जरांगे

न्यायाच्या देवतेबद्दल मी काही बोलणार नाही, कारण न्यायाची देवता ही गरीबांची शेवटची आशा असते. पण सरकारने डाव खेळला आहे, आणि आता त्यांच्या या डावाला प्रत्युत्तर देऊन त्यांची साजिश कशी उधळायची, हे आपल्यालाच ठरवावं लागेल. आंदोलन यशस्वी करायचं असेल, तर योग्य रणनीती आखावी लागेल; नाहीतर यश मिळणं कठीण आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते हे सर्व एकमेकांचे सहकारी आहेत. या नेत्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत, आणि आता ते सर्व एका रेषेत उभे आहेत — राज्यासाठी यापेक्षा मोठा संदेश काय असू शकतो? त्यामुळे छोटेपणं किंवा मोठेपणं असं काही नसतं. सगळे एकाच आचारसंहितेखाली आले, तर आंदोलन नक्कीच यशस्वी होईल आणि सर्वांना मैदानात उतरावं लागेल, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.
बच्चू कडूंचा अनुभव अधिक बोलका
बच्चू कडू यांच्या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात मोठा फरक आहे. त्यांनी अनुभवाच्या जोरावर आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या अनुभवातून आम्हाला समजतं की कोणत्या टप्प्यावर कोणता निर्णय घ्यावा. मला शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी फारशी माहिती नव्हती, पण आता मी ती शिकत आहे. महाराष्ट्राला अपेक्षा आहे की शेतकरी संघटनांचे नेते योग्य निर्णय घेतील, असं मनोज जरांगे म्हणाले.
